नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आपल्या सेवा देण्याच्या प्रक्रियेत वेळोवेळी सुधारणा करत आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा कशा देता येतील याकडे रेल्वेचा कल असतो.त्यातच आता प्रवाशांना विमानासारख्या सुविधा रेल्वेत देण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे लवकरच विमानाप्रमाणेच अनेक अत्याधुनिक सोईसुविधा देणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांना विमानाच्या प्रवासाचा फील घेता येणार आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वे लवकरच प्रीमियम ट्रेन्समध्ये ट्रेन होस्टेस सुविधा पुरवणार आहे. सुरुवातीला ही सुविधा वन्दे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेससारख्या ट्रेनमध्ये पुरवली जाईल. राजधानी आणि दुरांतो एक्सप्रेस सारख्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सध्या ही सुविधा उपलब्ध नसेल.
तसेच ‘ट्रेन होस्टेस’ म्हणून केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांची भरती देखील केली जाणार आहे. ‘ट्रेन होस्टेस’ ही सुविधा केवळ दिवसा दिली जाईल. रात्रीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध नसेल. ज्या प्रमाणे विमानांमध्ये असलेल्या ‘एअर होस्टेस’ प्रशिक्षित असतात, त्याप्रमाणे ‘ट्रेन होस्टेस’ही प्रशिक्षित असतील. रेल्वेच्या वतीने त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
IRCTC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियम ट्रेन्समध्ये होस्टेसची नियुक्ती करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की प्रवाशांनी उत्तमोत्तम सुविधा मिळाव्यात. त्यांना रेल्वेत चढण्यात, उतरण्यात, आपल्या जागी बसण्यात मदत व्हावी, त्यांना आवश्यक त्या गोष्टी आपल्या जागीच मिळाव्यात यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.
एका डब्ब्यात एक महिला आणि एक पुरुष नियुक्त करण्याची योजना असल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या प्रीमियम ट्रेन्स १२ ते १८ तासात आपला प्रवास पूर्ण कऱणार आहेत, त्यांच्यामध्येच ट्रेन होस्टेस ही सुविधा पुरवली जाणार आहे.