कमालीची गुप्तता राखत कारवाई; दोन पोकलेन, दोन जेसीबीच्या सहाय्याने पाडले बांधकाम
पाचगणी – छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्ष देणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान याच्या कबरीशेजारी उभारलेल्या अतिक्रमित अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत दोन पोकलेन, दोन जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पाडण्यात आले. प्रशासनाकडून याबाबत कमालीची गुप्तता ठेवत बांधकामावर हातोडा टाकण्यात आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी 1500 पोलीसांचा फौजफाटा तैनात करत महसूल विभागाकडून बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून जतन करण्यात येत असलेल्या अफझलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण व कबरीचे उदात्तीकरण वाढू लागले होते. याविरोधात अनेक शिवप्रेमी संघटनांनी आंदोलन करुन येथे होत असलेले उदात्तीकरण थांबविण्याची मागणी सातत्याने केली होती. हा वाद न्यायालयात देखील पोहोचला होता. अखेर उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी येथील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झाली नव्हती. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवून परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात येत होता.
सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजलखान कबर परिसरातील बेकायदेशीर बांधकाम पाडून हे शिवछत्रपतींच्या शौर्याचे प्रतिक नागरिकांसाठी खुले करावे अन्यथा ते हिंदुत्ववादी संघटना कायदा हातात घेऊन पाडतील, असा इशारा नुकताच दिला होता. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला होता. महाबळेश्वर व प्रतापगड परिसरात काल सायंकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढू लागला होता. कमालीची गुप्तता ठेवून हळूहळू पोलिस बंदोबस्त महाबळेश्वरपासून प्रतापगडपर्यंत तैनात करण्यात येत होता.
पहाटे चारच्या दरम्यान महाबळेश्वर येथील नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली. तसेच प्रतापगड पायथ्याशी वाडा कुंभरोशी येथील गडाच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी करण्यात आली. सुमारे 1500 ते 1800 पोलीसांची कुमक संपूर्ण परिसरात होती. या ठिकाणी पुणे ग्रामीण, सोलापूर, सांगली कोल्हापूर व साताऱ्यातील पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. याबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. प्रतापगड परिसरात तैनात असलेल्या वन विभाग कर्मचारी, महसूल विभाग व पोलिसांचे मोबाइल ताब्यात घेऊन दूरध्वनी संचावरुन संपर्क यंत्रणा राबविण्यात येत होती.
गडाच्या पायथ्यावरुन केवळ पोलिस, महसूल व वन विभागांची वाहने सोडण्यात येत होती. त्याचबरोबर मोठे ट्रक व डंपर पोलिस बंदोबस्तात वाहतूक करताना दिसत होते. कबर परिसरातील सर्व अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करण्यासाठी तीन ते चार जेसीबी, दोन पोकलेन व वाहतुकीसाठी डंपर, टेम्पोसह एसआरपीएफ जवान, महसूल विभाग कर्मचारी तैनात होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणा यासाठी काम करीत होती.
अनेक अडचणीतून यंत्रणेचे काम
पोलिसांसह वन विभाग व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना मध्यरात्रीपासून पहारा देताना प्रचंड थंडीचा सामना करावा लागला. तसाच दिवसभर भरउन्हात कामकाज करताना प्रशासकीय यंत्रणा प्रचंड तणावात दिसत होती. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक परिसरात तळ ठोकून होते. मात्र, परिसरातील अडचणीच्या ठिकाणी कारवाई होत असल्याने अनेक गैरसोयीतून यंत्रणेला मार्ग काढावा लागत होता.