World Cup 2023 India vs New Zealand Match Live Score : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा 21वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने डॅरिल मिशेलच्या शतकी आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 274 धावांची गरज आहे.
भारताला पाचवा धक्का…
भारतीय संघाचा निम्मा संघ 191 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सूर्यकुमार यादव चार चेंडूत दोन धावा करून धावबाद झाला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील गैरसमजामुळे टीम इंडियाला हा फटका बसला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, विजयासाठी 274 धावांचा पाठलाग करताना सध्या भारताच्या 38 षटकात 5 बाद 217 धावा झाल्या असून टीम इंडियाला जिंकण्यासाठी 72 चेंडूत 57 धावांची आवश्यकता आहे. सध्या क्रीजवर विराट कोहली 68*(71) आणि रवींद्र जडेजा 12*(18) धावांवर खेळत आहेत.
विराट कोहलीचे अर्धशतक…
विराट कोहलीने आपले अर्धशतक 60 चेंडूत पूर्ण केले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 69 वे अर्धशतक आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर कोहलीने आणखी एक उत्कृष्ट खेळी खेळली असून या सामन्यात टीम इंडिया कायम आहे. त्याने 12व्यांदा विश्वचषकात 50 हून अधिक धावांची इनिंग खेळली आहे. यासह तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
182 धावांवर भारताची चौथी विकेट पडली. लोकेश राहुल 35 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. मिचेल सँटनरने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. त्याआधी 21.3 षटकात 128 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. श्रेयस अय्यर 29 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला डेव्हन कॉनवेकरवी झेलबाद केले.
13.2 षटकात 76 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल 31 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. लॉकी फर्ग्युसनने त्याला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. त्याआधी 11.1 षटकात 71 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा 40 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. लॉकी फर्ग्युसनचा चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठाला लागला आणि स्टंपवर गेला.