धोकादायक स्थितीमुळे दुरुस्ती सुरू होणार
पुणे – सोलापूर रस्त्यावरील हडपसर येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने दुरुस्तीच्या कामामुळे या उड्डाणपुलाची पुण्याहून सोलापूरकडे जाणारी मार्गिका जड वाहतुकीसाठी मंगळवारपासून ( 18 जानेवारी) बंद ठेवण्यात येणार आहे.
हडपसर उड्डाणपुलाला हादरे बसत असल्यामुळे जड वाहनांची वाहतूक धोकादायक ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलावरून पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून सर्व प्रकारच्या जड वाहनांना पुढील आदेशापर्यंत बंदी केली आहे.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले. जड वाहनांना सोलापूरकडे जाताना उड्डाणपुलाखालून जावे लागेल. तर, सोलापूरकडून पुण्यात येणाऱ्या वाहनांना उड्डाणपूल खुला असेल, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.