वॉशिंग्टन – पुढील आर्थिक वर्षासाठी “एच 1-बी’ व्हिसा मिळवण्यासाठीच्या नोंदणीची प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या अर्जदारांपैकी संगणकीय लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार असून 31 मार्च रोजी या यशस्वी उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. “युएस सिटीझनशीप ऍन्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.
‘एच 1-बी’ व्हिसासाठी लॉटरी पद्धतीने निवड करण्याची प्रथा सुरू ठेवली जाईल, असे नवीन अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले होते. विदेशी व्यवसायिकांना कामाची परवानगी देण्यासाठी या पद्धतीची जोरदार मागणी करण्यात येत होती.
2022 या आर्थिक वर्षासाठीच्या प्राथमिक नोंदणीची प्रक्रिया 9 मार्च रोजी दुपारी सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारपर्यंत सुरू राहिल, असे “युएससीआयएस’ने जाहीर केले आहे.
“एच 1-बी’ व्हिसाच्या आधारे अमेरिकेतील कंपन्या विदेशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात. प्रामुख्याने तांत्रिक आणि सैद्धांतिक क्षेत्रातील तज्ञांना या व्हिसाच्या आधारे अमेरिकेत नोकऱ्या मिळतात. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी भारत आणि चीनमधील तज्ञ व्यक्तींना या व्हिसाच्या आधारे नोकऱ्या उपलब्ध करून देत असतात.