नेवासा – नेवासा तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या प्रमुख उपस्थित गुरुवार (दि.२५) रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न झाले.
या नविन तहसिल कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रणाप्रसंगी व्यासपिठावर भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराल लंघे – पाटील, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भगवानराव गंगावणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई अंबाडे, शिवसेनेचे शहरप्रमुख बाबा कांगुणे, अशोकराव कोळेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुरेश दुबाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विखे – पाटील यांनी तहसील कार्यालयाची नवीन इमारत उद्घाटन सोहळ्याला उशीर झाल्याचे मान्य करत या तहसील कार्यालयाला जागा देणाऱ्या पोतदार बंधूं यांचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलतांना विखे – पाटील म्हणाले की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी “हे विश्वची माझे घर” हा संदेश माऊलींच्या पुण्यभूमीत दिलेला असतांना राजकारणात संकुचित वृत्ती आणि विचार ठेवून ही इमारत याने बांधली आणि त्याने बांधली याचे राजकारण न करता विकासात्मक कामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगून नेवासा तिर्थक्षेत्र विकासाच्या भरभराटीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी विखे – पाटील यांनी यावेळी बोलतांना दिले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपण अनेकांचा बंदोबस्त केलेला असून वाळूतस्करांनाही चांगलाच घडा शिकविलेला आहे, नेवासा तालुक्यात वाळू आणि मुरुम तस्कारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नेवासा तहसिलदार संजय बिरादार यांना दिले.
शासनाच्या वाळू लिलावाला एकीकडे विरोध केला जात असतांना दुसरीकडे अवैध वाळू आणि मुरुम तस्करी चालू आहे यासाठी ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवून महसूल विभागाने कारवाई करण्याचे आदेशही यावेळी विखे – पाटील यांनी दिले. नेवाशाच्या सर्वांगिन विकासाला चालना देण्यासाठी तिर्थक्षेत्र विकास कामासाठी निधीची तरतुद करुन विकास कामे मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेची पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील भाजप-सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.
दैनिक प्रभात वृत्तपत्राने सतत वस्तुनिष्ठ आणि निर्भिड बाण्याची पत्रकारिता केल्यामुळे प्रशासनावर दैनिक प्रभातचा वेगळा ठसा आणि आदरयुक्त दबदबा असल्याचे नेवासा तालुक्यात वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. नेवासा तहसिल कार्यालयाची नवी इमारत पुर्ण होवूनही गेल्या दोन वर्षांपासून या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला प्रशासनाकडून मुहूर्त सापडत नसल्यामुळे नवी इमारती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच दैनिक प्रभातच्या दणक्यामुळे केवळ सहा दिवसातच अखेर प्रशासनाला मुहूर्त सापडून गुरुवार (दि.२५) रोजी पालकमंत्रारी धाकृष्ण विखे – पाटील याच्या हस्ते व जिल्ह्याधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या प्रमुख उपस्थित नव्या इमारतीचे उद्धाटन करण्यात आल्यामुळे दैनिक प्रभातच्या निर्भिड पत्रकारितेचे जनतेतून कौतुक केले जात आहे.