नेवासा – मानधन वाढीसह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नेवासा तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गुरुवारी (दि.२८) रोजी काम बंद करून नेवासा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा’, अशा घोषणा देत सेविकांनी मोठ्या आक्रमकपणे मोर्चा काढून आंदोलन केले.
राज्य सरकारने वेळोवेळी मानधनवाढीचे आश्वासन दिले; मात्र ते पाळले गेले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना काम बंद करुन मोर्चा काढण्याची वेळ आली असून राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणीही यावेळी मोर्चाकरी अंगणवाडी सेविकांनी केली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अंगणवाडी सेविका, मदतनीस काम बंद आंदोलन सुरूच ठेवतील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार बोरुडे यांना दिले. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. अंगणवाड्या संप काळात बंद ठेवून तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एकत्रित आल्या. येथून दुपारी १२ वाजता नेवासा तहसिल कार्यालयावर हा मोर्चा आणण्यात झाला.
नेवासा तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आलेल्या सेविका, मदतनिसांनी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका रंजना खरात, सुनिता पवार, सुरेखा नवले, कांचन नवले, कविता नवले, प्रमिला गव्हाणे, कुसूम फुलारी, हिरा फुलारी, वंदना मापारे, कुसूम फुलारी, पुष्पा गुंड, आशा खरात, मंगल खरात, वर्षा बनसोडे, सविता शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होत्या.
दरम्यान, तहसील कार्यालयात निवेदन देवून मोर्चा संपल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली. विविध मागण्यांचे निवेदन आमदार गडाख यांचे स्विय सहाय्यक सुनिल जाधव यांना देण्यात आले.