कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ झाला. गेल्यावर्षी ची सभा झाली नाही त्या सभेचे प्रोसिडिंग वाचलेच कसे यावरून सत्ताधार्यांना धारेवर धरले आणि गोंधळाला सुरुवात झाली. त्यामुळं नेहमी प्रमाणे आजची वार्षिक सभा प्रचंड गोंधळात आटोपती घेतली.
गोकुळ दूध संघाची सभा सुरू झाल्यानंतर पहिला विषय मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा विषय होता. त्याप्रमाणे प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात झाली. मात्र गेल्या वर्षीची सर्व सभा गुंडाळली असताना यावर्षी मात्र त्याचे प्रोसिडिंग कसे काय लिहिले असा जाब विचारण्यात आला. मात्र या सभेला मंजुरी मिळाली आहे. तसेच शासनाने मंजुरी केली आहे असे सांगून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. समर्पक उत्तर न मिळाल्याने वादाला सुरूवात झाली.
जिल्हा दूध संघाच्या 2018/19 या वार्षिक सभेचा पहिलाच विषय वादाचा ठरला. ही सभा झालीच नाही असा आक्रमक पवित्रा कृती समितीने घेतला. त्यामुळे सभेच्या पहिल्याच मुद्यावरून सभा वादळी ठरली आहे. विश्वास देवकर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सभेचे अध्यक्ष म्हणून नरके यांनी सभेचा वृत्तांत वाचून दाखवावी, अशी मागणी केली. यावेळी समितीच्या सदस्यानी ठिय्या मांडला. अजून ही सभेत गोंधळ सुरू आहे.
दरम्यान, गोकुळच्या सभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने गोकुळची सभा चाळीस मिनिटात आटोपती घ्यावी लागली. सत्ताधाऱ्यांकडून सभेचे पूर्ण कामकाज करण्याची तयारी असतानाही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे कामकाजामध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे सभेचे कामकाज गोंधळामध्येच संपवावे लागले.
संचालक रणजीत पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपली असं जाहीर केलं. ही सभा गुंडालळी असा आरोप विरोधकांनी केला. तर सभा व्यवस्थित झाली असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. मात्र, विरोधकांच्या गोंधळामुळे हे करता आले नसल्याचे सभेचे अध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितलं. निवडणुकीमुळे सभा वादळी होणार हे निश्चित होतं आणि घडले ही तसंच.मात्र,यंदा खुर्चा बांधून ठेवल्याने हाणामारी न होता फक्त गोंधळामध्येच ही सभा गुंडाळण्यात आली
सभेमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी दरवर्षी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यावर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही ही सभा झाल्याने सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यंदाही जवळपास 150 पोलीस सभास्थळी तैनात करण्यात आला होता.