मुंबई- झी मराठीवरील मालिका माझा होशील ना ही मालिका काही काळातच प्रचंड लोकप्रिय झाली. त्यातील आदित्य आणि सईची जोडी महाराष्ट्रात सगळ्यांची आवडती झाली आहे. याच मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि तिचे आजोबा हे सोबत काम करताना दिसणार आहे.
व्यवसायात, राजकारणातील आजोबा आणि नातवाची जोडी प्रसिद्धच आहे मात्र झी मराठीवरील या मालिकेतील जोडी आता महाराष्ट्रभर धुमाकुळ घालणार असं या मालिकेच्या प्रोमोमधून दिसून येत आहे.
याबाबतची माहिती गौतमीने स्वत; सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. हे माझे खरेखुरे आजोबा आहे, लाडाचे आजोबा आहेत. आम्हाला म्हणजेच मृण्मयी देशपांडे आणि मला अभिनयाचा वारसा यांच्याकडूनच मिळाला आहे. यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असं तिने या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, या मालिकेतील प्रत्येक पात्राने एक वेगळी छाप सोडली आहे. मालिकेतील अभिनेता विराजस कुलकर्णी याला देखील अभिनयाचा वारसा लाभला आहे. तो प्रसिद्ध, बहूआयामी अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे.