नाशिक – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्तेत असलेले महाविकास आघाडी यांच्यातील मतभेद सर्वश्रूत आहेत. महाविकास आघाडीतील नेते वेळ मिळेल तिथे कोश्यारी यांच्यावर टीका करत असतात. तर कोश्यारी देखील सरकारच्या कारभारावर टीका करण्यास मागे हटत नाही. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. येवढ्यावरच न थांबत कोश्यारी यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. सरकारमधील अनेक मंत्री आपल्या मागण्या घेऊन माझ्याकडे येतात. मग सरकार नेमकं करत काय, असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थित केला.
तत्पूर्वी भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल म्हणाले की, माझ्यासाठी सगळेच देवमामलेदार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. भुजबळांनी संपूर्ण बळ लावलं म्हणून हे स्मारक होत आहे. त्यामुळे भुजबळही सर्वपक्षीय होवोत अशी देवमामलेदारांना प्रार्थना करा. जेणेकरून सर्व भांडण संपून जाईल आणि तुम्हाला भरघोस निधी मिळेल, असं सांगत राज्यपालांनी थेट भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.