- कारभाराचा अजब नमूना : माहिती अधिकारात माहिती देण्यास अधिकारी करताहेत करोनाचे कारण पुढे
कर्जत – शासकीय कारभाराचा आपणा सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतलेला असतो. सरकारी काम आणि सहा महिने थांब असाच अनुभव अनेकांना आलेला असतो, त्यामुळे शासकीय योजना तसेच त्यावर झालेला खर्च याची तोंडी माहिती मागितली तथा विचारली तर मिळत नाही म्हणून अर्ज केला जातो, अर्ज करून माहिती मिळत नाही म्हणून माहितीचा अधिकार टाकला जातो.
मात्र महिना ओलांडूनही माहिती वेळेवर मिळत नाही याची चौकशी केली असता, तर करोनामध्ये कर्मचारी गुंतली गेली आहेत म्हणून माहिती देण्यास उशीर होत आहे, असे उडवाउडवीची उत्तरे देऊन पळवाट काढण्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयात दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे आता शासकीय काम आणि करोनासंपेपर्यंत थांब, अशी विदारक झाली आहे.
नगरपरिषद, पंचायत समिती, वीज वितरण, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, तलाठी आदी शासकीय कार्यालयात माहिती मिळण्यासाठी माहितीचा अधिकार टाकल्यास तर महिनाभरात माहिती देणे बंधनकारक असताना महिना ओलांडूनही माहिती उपलब्ध होत नसल्याचे अर्जदार आणि नागरिकांचे म्हणणे आहे.
महिना ओलांडून गेला तरी माहिती न मिळाल्यास अधिकाऱ्यांना विचारल्यास ठीक आहे सांगतो. देतो थांबावा लागेल, असे मोगम उत्तर देऊन जबाबदारी टाळत आहे. तसेच अपील करण्याचा पुढाकार घेतल्यास तर अधिकारी म्हणतात की वेळ निघून गेली आहे, तर आता अपील करायला जमणार तर पुन्हा माहितीचा अधिकार टाका, असे सांगण्यात येत असल्याचे प्रकार सध्या कर्जतमध्ये शासकीय कार्यालयात घडत आहे.