पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे अजून बॉम्ब शोधक व नाशक पथक नव्हते. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. नुकतीच या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे अतिक्रमण कारवाई करताना ब्रिटीशकालीन बॉम्ब आढळून आला. यापूर्वीही अशा प्रकारचे बॉम्ब शहरात आढळून आले आहेत. शहरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यात स्फोटक आहे की नाही, याबाबतची तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण केले जाते. तसेच शहरात महत्वाच्या व्यक्ती येणार असल्यास त्या ठिकाणी या पथकाकडून पाहणी केली जाते.
याशिवाय यात्रेच्यावेळी व सणासुदीच्यावेळी अत्यंत गर्दीच्या ठिकाणीही या पथकाकडून तपासणी केली जाते. मात्र पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असले तरी बॉम्ब शोधक व नाशक पथक नाही. बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे.
या पथकामध्ये सध्या दोन टीम 24 तास कार्यान्वित असणार आहे. प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी, स्फोटकाबाबतची माहिती देण्यासाठी अद्यावत साधन सामग्री आणि प्रशिक्षित श्वान पथक यांचा यात समावेश असणार आहे. सध्या पोलीस दलात असलेल्या आणि बॉम्ब शोधक नाशक पथकात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जोखीम जास्त म्हणून पगारही जास्त
बॉम्ब शोधक व नाशक पथकात काम करताना अनेकदा स्फोटके हाताळताना दुर्घटना घडून त्यात प्राणांतिक प्रसंगही उद्भवू शकतात. याची जाणीव शासनाला असल्याने या पथकातील कर्मचाऱ्यांना इतर पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षा जादा वेतन दिले जाते. या जादा वेतनासाठी अनेकजण या पथकात सहभागी होतात.
शहराला मिळणार आणखी चार सहायक आयुक्त
पिंपरी चिंचवड शहरात आठ सहायक आयुक्तांची पदे मंजूर असून सध्या आठही जण कर्तव्यावर आहेत. मात्र अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने आणखी चार सहायक आयुक्तांची पदे शासनाकडून मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे आता आयुक्तालयास 12 सहायक आयुक्त मिळणार आहेत. तसेच आणखी एक अपर आयुक्तांचे पद आणि दोन पोलीस उपायुक्तांची पदेही नव्याने मंजूर झाली आहेत.