- श्रीनिवास वारुंजीकर
पुणे – प्रोफेशनल ड्रायव्हर्स, हौशी पर्यटक, होम डिलिव्हरी देणाऱ्या शेकडो कंपन्यांचे लक्षावधी डिलिव्हरी बॉईज अशा अनेकांचे आधार असलेले सर्वात विश्वासार्ह असे गुगले गुगल मॅप्स हे तूल वादाच्या केंद्रस्थानी सापडले असून यावेळी महाराष्ट्रातील अनेक गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होतो आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राची सीमा उत्तरेकडे अगदी लागून आहे आणि गुजरातमधील उंबरगाव आणि वेवजी या गावांत सातत्याने सीमेवरुन वाद होत असतो. महाराष्ट्राच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गाव उंबरगावच्या पंचायतीने गुजरातमध्ये दाखवल्याचे अनेकदा दिसून आले होते. आता गुगल मॅप्सवरही तसेच दिसत असल्याने उंबरगाव प्रशासनाविरोधात वेवजी ग्रामस्थ असा संघर्ष पुन्हा निर्माण होत आहे.
केवळ उंबरगाव आणि वेवजी गाव असा मर्यादित वाद असताना आता गुगल मॅप्सवर महाराष्ट्रातील वेवजी गावासह इंडिया कॉलनी, मेहेरणोसची बोमन इंग्लिश स्कूलसह बराच मोठा परिसर गुजरात राज्यात दाखवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यामागे नक्की कोणाचा हात आहे, याची चौकशी करण्याची मागणी वेवजी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तसेच तलासरीच्या तहसिलदार स्वाती धोंगडे यांनी भारतीय सर्वेक्षण विभागाला, या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
गुगल नकाशावार वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेअंतर्गत दर्शवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान, वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं 204 चा भुखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर 174 या दोन भुखंडावर दोन राज्यांची सिमा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चिात नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत. महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा निश्चिात करण्याची मागणी होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील सापुतारा महाराष्ट्रात दाखवण्यात आले होते. त्यामुळे गुगल मॅप्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लोकल गाईड्सचा प्रताप?
गुगल मॅप्समध्ये फोटो, व्हिडीओज अपलोड करणे, रिव्ह्युज लिहिणे आणि नकाशातील काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणे अशा विविध हेतूंनी “लोकल गाईड्स’ जगभर काम करत असतात. त्यांच्या प्रत्येक अपलोड, दुरुस्ती, प्रश्नोत्तरे यासाठी मॅप्सकडून पॉईंट्सही दिले जातात. मात्र, हे सगळे समाजोपयोगी दृष्टीकोनातून चालते. शिवाय मॅप्समधील एखाद्या “लोकल गाईड’ने सुचवलेली दुरुस्ती गुगलकडून खात्री केल्यानंतरच अंमलात आणली जाते. मात्र, हे राज्यांच्या सीमा बदलण्याचे कृत्य कोणा समाजविघातक “लोकल गाईड’ने केले आहे का, याचा शोध गुगललाच घ्यावा लागणार आहे.