अजित पवारांच्या आदेशाने पंचनाम्यांना वेग : चार हजार हेक्टर बाधित
बारामती- बारामती तालुक्यात आठवड्यात दुसऱ्यांदा ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान तसेच घरांची पडझड झाली आहे. संपूर्ण राज्याचा कारभार पाहणारे अजित पवार यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर भल्या पहाटेच भ्रमणध्वनी खणखणला. तालुक्यातील शेतीचे पंचनामे तात्काळ करा, तसेच अहवाल सादर करा, असे आदेश सुटल्यानंतर अधिकाऱ्यांचा ताफा पहाटेच बांधावर दाखल झाला. बाधित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. तालुक्यातील 117 गावे बाधित झाली आहेत. अंदाजे चार हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
चार दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पावसामुळे जलसंधारणाच्या कामातील सिमेंटचे बंधारे, पाझर तलाव, ओढे-नाले भरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, उसाचे नुकसान झाले आहे. फळबागांना फटका बसला. बुधवार (दि.9) रात्री शहर व तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आहे.
उपमुख्यमंत्री पवार हे अधिवेशनात असल्यामुळे संपूर्ण राज्याचा माहिती आणि आढावा घेत आहेत. त्यातच बारामतीला बसलेला फटका शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पहाटेच त्यांनी अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. शेतकरी या नैसर्गिक आपत्तीतून सावरले पाहिजेत, यासाठी पंचनामे करा, असे आदेश त्यांनी सोडले. त्यानंतर कृषी, महसूल, पाटबंधारे विभागाचे अधिकारी वाकी, चोपडज, मुर्टी, पळशी, मोढवे, मोराळवाडी, कानाडवाडी, वडगावनिंबाळकर परिसरात दाखल झाले आहेत.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण घोरपडे, वडगावचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, यांनी पहाटे दोनपासून सकाळी सातपर्यंत प्रत्येक ठिकाणी भेट देत पाहणी केली. पवार यांच्या कामातील कार्यतत्परतेची झलक तालुक्याला पाहावयास मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
- ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. वडगाव निंबाळकर परिसरात काही घरात पाणी शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे फोनवरून संपूर्ण नुकसानीची माहिती घेतली. याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
– संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी, बारामती.
- बारामती तालुक्यातील आठ महसूल मंडळात आठवड्यात दुसऱ्यांदा 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे आठही मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच बाधित क्षेत्राची आकडेवारी समोर येईल.
– दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, बारामती.