गोंदिया – गोंदियात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाला. यात दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. गोंदियातील रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या ठाकनी भागवत टोला रस्त्यावर हा अपघात झाला.
कुमेंद्र बिसेन (वय 36 वर्ष), आदित्य बिसेन (7), मोहित बीसेन (11) आणि आर्वी तूरकर (5) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ठाकनी भागवत टोला रस्त्यावर ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. यात तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
गोंदिया येथील पिंकेपार येथे लग्न सोहळ्याकरिता बिसेन कुटुंबीय दास गावावरून आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर दासगाव येथे परत आपल्या मोटरसायकलने जात होते. तेव्हा ठाकनी भागवत टोला या रस्त्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन मुलांचा व बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. याची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. ट्रक चालकाविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.