मुंबई – अचानक अमेरिकेत आक्रमक व्याजदर वाढ होण्याची शक्यता वाढल्यामुळे जागतिक चलना बाजारात डॉलर वधारला आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढला. त्यामुळे सोन्यातील बरीच गुंतवणूक तिकडे वळल्याने सोन्याचा दर कमी झाला असल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 473 रुपयांनी कमी होऊन 53,898 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. तयार चांदीचा दर 1,241 रुपयांनी कमी होऊन 65, 878 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,770 डॉलर व चांदीचा दर 22.38 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
कालपर्यंत साने आणि चांदीचा दर वधारत होता. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये सेवा क्षेत्रातील रोजगार निर्मिती आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.
यामुळे अमेरिकेमध्ये दीर्घ पल्ल्यात व्याजदर उच्च पातळीवर ठेवावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा गुंतवणूक डॉलरकडे वळत आहे. त्यामुळे डॉलरबरोबरच अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. या घडामोडीचा इतर बाजारावरही परिणाम होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.