नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात सोमवारी बरीच घट नोंदली गेली. सोन्याचा दर 317 रुपयांनी कमी होऊन 45,391 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,128 रुपयांनी कमी होऊन 62,572 रुपये प्रति किलो झाला.
यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की अमेरिकेमध्ये रोजगार निर्मिती वाढली आहे. त्याचबरोबर डॉलर बळकट होत असल्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारातही झाला आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1749 डॉलर तर चांदीचा दर 23.91 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे फेडरल रिझर्व अपेक्षेपेक्षा लवकर सवलती कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानिया यांनी सांगितले.