नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील स्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले जावे. त्यासाठी मोदी सरकारने पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली. त्यावरून भाजपने त्यांच्यावर पलटवार केला. कॉंग्रेसशासित हिमाचलला पाऊस आणि पुराचा जोरदार तडाखा बसला. त्या राज्याचा प्रियंका यांनी मंगळवारी दौरा केला.
त्यांनी आपत्तीग्रस्त भागांना भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त कुटूंबांच्या मदतीला पुढे येऊन हिमाचलमधील जनतेने देशापुढे एक उदाहरण घालून दिले. राज्य सरकारही मर्यादित स्त्रोतांची तमा न बागळता जनतेला दिलासा देण्यासाठी कार्यरत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीशिवाय हिमाचलला पूर्वपदावर आणणे अवघड जाईल, असे त्यांनी म्हटले.
त्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रियंका यांनी केलेल्या टीकेला हिमाचल भाजपने प्रत्युत्तर दिले. पाऊस आणि पुराने तडाखा दिलेल्या हिमाचलला प्रियंका यांनी दोन महिन्यांनंतर भेट दिली. हिमाचल भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपने दिली.