शेवगाव – तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व 18 जागा जिंकत माजी आ. डॉ. नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले, तसेच माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाने भाजप, कॉंग्रेस, मनसेप्रणित महायुतीच्या आदिनाथ शेतकरी विकास मंडळाला पराभूत करून बाजार समितीवर आपले अधिपत्य कायम राखले. मतदारांनी विरोधकांकडे पूर्ण दुर्लक्ष करून सत्तेच्या चाव्या पुन्हा घुले बंधूकडे दिल्याचेच मतमोजणीतून स्पष्ट झाले.
रविवारी (दि. 30 ) येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 2 हजार 187 पैकी 2 हजार 137 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 97.71 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणीमध्ये राष्ट्रवादीप्रणित ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाचे सर्व 18 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळाविरुद्ध आ. मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळात सरळ लढत झाली.
बाजार समितीवर सुमारे 50 वर्षांपासून घुले घराण्याची अनभिषीक्त सत्ता होती. ती याही वेळेस कायम राहिली आहे. या विजयाने घुलेसमर्थकांचे मनोबल उंचावले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर होताच घुले बंधूंनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेत प्रचारात सातत्यही ठेवले. तर दुसरीकडे विरोधकांना पॅनल करण्यासाठी कॉंग्रेस, मनसेलाही सोबत घ्यावे लागले. तसा विरोधकांचा सर्व डोलारा एकट्या आ. राजळे यांनी सांभाळला. खा. डॉ. सुजय विखे यांनी अभावानेच लक्ष दिल्याची भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. आव्हाणे येथील मेळाव्याला ते आले नाहीत. तसेच आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तरी ते धावती भेट देतील, अशी अपेक्षा त्यांचे चाहते करत होते. आ. राजळे यांनी घुले विरोधकांची एकजूट करून लढा दिला. मात्र, तो कमी पडला.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी – सोसायटी सर्वसाधारण – अनिल मडके (627), गणेश खंबरे (626), जमीर पटेल (619), एकनाथ कसाळ (631), अशोक धस (629), राहुल बेडके (632), नानासाहेब मडके (615). ग्रामपंचायत सर्वसाधारण –
संजय कोळगे (537), अशोक मेरड (515). सोसायटी इतर मागास प्रवर्ग – हनुमान पातकळ (664). सोसायटी विमुक्त जाती/ भटक्या जमाती – राजेंद्र दौंड (679).सोसायटी महिला राखीव – चंद्रकला श्रीकिसन कातखडे (683), रागिणी सुधाकर लांडे (682). ग्रामपंचायत अनु. जाती/ जमाती – अरुण घाडगे (549), ग्रामपंचायत दुर्बल घटक – प्रीती राम अंधारे (534). व्यापारी/ आडते – जाकीर कुरेशी (153), मनोज तिवारी (158). हमाल/ मापाडी – प्रदीप काळे (189).
विजयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास
मतदानाची वेळ सायंकाळी चारपर्यंत होती. पण हमाल मापाडी मतदारसंघातील सर्वच्या सर्व 221 मतदारांचे मतदान दुपारी 3च्या आत झाले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप काळे यांच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू केली.