नवी दिल्ली – गुंड सचिन बिष्णोई याला आज अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात आले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात हात असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दिल्ली विमानतळावर त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि दिल्लीतील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सचिन बिष्णोई याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सचिन बिष्णोई याला अझरबैजानमधून परत आणण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाचे पथक अझरबैजानची राजधानी बाकू येथे गेले होते. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी हे पथक तेथे गेले होते. “सचिन बिष्णोई याला आज सकाळी बाकू येथून यशस्वीपणे भारतात परत आणले गेले आहे.’ असे विशेष विभागाचे पोलीस आयुक्त एचजीएस धालिवाल यांनी सांगितले.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या कटाला सुविधा पुरवण्याची जबाबदारी सचिन बिष्णोई याने पार पाडली होती, असे सूत्रांनी म्हटले आहे. हत्येच्यावेळी तो परदेशात होता. पण आपणच मुसेवालाला गोळ्या घातल्या असा दावा करून त्याने तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
मुसेवालाच्या हत्येपूर्वीच सचिन बिष्णोई भारतातून बाहेर गेला होता. तो प्रथम दक्षिण दिल्लीतील संगम विहार येथील रहिवासी तिलकराज तुतेजा या नावावर बनावट पासपोर्टच्या आधारे दुबईला गेला होता. त्याने रेकी करून आणि हत्येसाठी वाहन उपलब्ध करून हत्येच्या कटाला मदतच केली होती, असे सूत्रांनी सांगितले.
दुबईशी भारताचे चांगले संबंध असल्यामुळे आपले प्रत्यार्पण केले जाऊ शकते या भीतीमुळे तो अझरबैजानला पळून गेला. पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तेथे त्याला ताब्यात घेतले गेले होते. तेथे त्याने जामीन मिळवण्याचा प्रयत्नही केला होता. पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता, असेही सूत्रांनी सांगितले.
बिष्णोई गॅंगमधील आणखी एका गुंडाचे प्रत्यार्पण…
अन्य काही प्रकरणांमध्ये सचिन बिष्णोईविरोधात मोक्का लावण्यात आला आहे. गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ सचिन बिष्णोई आणि आणखी एक आरोपी अनमोल बिष्णोई हे दोघे मूसेवालाच्या हत्येपूर्वी बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून गेले होते. घटनेच्या वेळी गॅंगस्टर गोल्डी ब्रार हा सिग्नल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून हल्लेखोरांच्या संपर्कात होता. या हत्या प्रकरणी “एनआयए’ने विक्रमजीत सिंग उर्फ विक्रम ब्रार याला देखील “युएई’मधून भारतात परत आणले आहे.