पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता 2017 मध्ये आल्यावर विकासाचा झंजावात सर्वत्र दिसत आहे. विकासाची गंगा गल्लोगल्ली पोहोचली आहे, असा दावा चिंचवड विधानसभेचे भाजप निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केला आहे.
दै. प्रभातच्या पिंपरी कार्यालयातील गणरायाचे दर्शन घेतल्यावर ते बोलत होते. या वेळी बोलताना जगताप म्हणाले, “”स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आणि सांगवी परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. अर्बन स्ट्रीट ही संकल्पना काळेवाडी, रहाटणी, वाकड, चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भोसरी परिसरात राबविली आहे. आगामी 30 वर्षांतील पाण्याची पाइपलाइन, ड्रेनेज लाइन कशी असावी याचे नियोजन केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 तासांमध्ये एट टू एटींन प्रकल्प अंतर्गत आठ ते 80 वर्षापर्यंतच्या नागरिकांसाठी उद्यान तयार करण्यात आले.”
शहरात 24 तास पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल. आगामी महापालिका निवडणूकीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाच्या दिवशी “अब की बार सौ पार’ हे टार्गेट दिले आहे. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर हे टार्गेट आम्ही पूर्ण करू. संपूर्ण जग करोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहे. असे संकट पुन्हा येऊ नये, असे साकडं आपण गणरायाला घातले असल्याचेही शंकर जगताप म्हणाले.