नगर, (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोर्हाळे शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदार अटक केली. त्यांच्याकडून १ तलवार, १ कटावणी, १ कत्ती, १ लाकडी दांडके, मिरचीपुड, ४ विविध कंपनीचे मोबाईल, २ चारचाकी कार असा १० लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (वय २१, रा.इंदिरानगर, ता.कोपरगाव), अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे (वय २०, रा.एकरुखे, ता.राहाता), समाधान देविदास राठोड (वय २३, रा.करंजीबोलकी, ता.कोपरगाव), संदीप पुंजा बनकर (वय ३३, रा.द्वारकानगर रोड, शिर्डी), उमेश तानाजी वायदंडे (वय २७, रा.गणेशनगर, ता.राहाता) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गणेश भिकुनाथ तेलोरे (रा. गणेशनगर, ता.राहाता), राहुल शिवाजी शिदोरे (रा.गोकुळनगर, ता.कोपरगाव) हे दोघे फरार झाले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघड करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार त्यांनी सपोनि हेमंत थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे आदींचे पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केले. या नुसार सपोनि हेमंत थोरात यांना दि.१५ फेब्रुवारीला गुप्त माहिती मिळाली की, मयूर उर्फ भुऱ्या गायकवाड त्याच्या काही साथीदारासह २ कारमध्ये येऊन देर्डे-कोऱ्हाळे शिवारात दरोडा घालण्याचे तयारीत आहे. थोरात यांनी प्राप्त माहिती पथकास दिली. पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले. या ठिकाणी काही इसम अंधारामध्ये दिसून आले. पाठलाग करत पोलिसांनी वरील आरोपीना ताब्यात घेतले.