पुणे – पुण्यातील ग्रामदैवत असलेल्या व मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या गणरायाची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. पुष्पवृष्टी करत पालखीद्वारे मिरवणूक काढत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सव मंडपापासून सकाळी आठ वाजता मिरवणूक निघाली. पुढे फडके हौद, देवाजी बाबा चौक, दारुवाला पूल, अपोलो थिएटर चौक येथे पोहोचली.
रास्तापेठ पॉवर हाऊस येथे मूर्तीकार अभिजीत धोंडफळे यांच्याकडून श्रींची मूर्ती घेऊन ती चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक पुन्हा फडके हौदमार्गे उत्सव मंडपाकडे मार्गस्थ झाली. मिरवणुकीत प्रभात बॅंड, संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम ढोल ताशा पथक, शौय ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. उत्सव मंडपाबाहेर गणरायाच्या पालखींचे आगमन होताच पुष्पवृष्टी करत मोरया…..असा गजर करण्यात आला.
बेळगाव येथील डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते सकाळी 11.37 वाजता बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा या मंडळाने मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकर्षक देखावा उभारला आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात आली.