विश्रांतवाडी, दि. 3 (प्रतिनिधी) -महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये गणेश विसर्जनासाठी विसर्जन हौदाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने तसेच गणेश भक्तांची विसर्जनावेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. या हौदामध्येच गणेश विसर्जन करावे, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले आहे.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विसर्जनासाठी या गणेश भक्तांना हौदाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील लुम्बिनी उद्यान येथील हौद तसेच येरवडा पोस्ट कार्यालय एमईएस कॉलनीच्या सीमा भिंतीलगतचा हौद विसर्जनासाठी खुला करण्यात आला आहे. यामध्ये गणेश भक्तांना आपल्या बाप्पांचे विसर्जन करता येणार आहे.
गणेशविसर्जन पर्यावरणपूरक करण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे. लुम्बिनी गार्डन, येरवडा पोस्ट कार्यालयानजीक विसर्जन हौदाची सुविधा दिली आहे. त्यामध्ये गणेश विसर्जन करावे. विसर्जनावेळी नदीपात्र, तलावामध्ये निर्माल्य टाकू नये. प्रभाग क्रमांक दोन मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून वेगळा आदर्श घालून देऊयात.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे,माजी उपमहापौर, पुणे महापालिका