- जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे करण्यात आली व्यवस्था
पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात करोनावर उपचार सुरू असल्यामुळे सध्या नेत्र शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे 4 रुग्णालयांमध्ये मोफत मोतीबिंदू व इतर नेत्र शस्त्रक्रियांसाठी संदर्भित करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयात सध्या करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे येथे तात्पुरत्या स्वरूपात मोफत मोतीबिंदू व इतर नेत्र शस्त्रक्रिया करण्याचे कामकाज बंद आहे. या पार्श्वभूमीवर, अशासकीय स्वयंसेवी संस्थेत मोफत मोतीबिंदू व इतर नेत्र शस्त्रक्रियेसाठी संदर्भित सेवा देण्यात याव्यात, अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय (पुणे), मोहन टुसे नेत्र रुग्णालय (नारायणगाव), ग्लोबल आय हॉस्पिटल (पुणे), दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (पुणे) या रुग्णालयांमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कार्यरत नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांमार्फत मोफत मोतीबिंदू व इतर नेत्र शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेले रुग्ण अशासकीय स्वयंसेवी संस्थेकडे मोफत मोतीबिंदू व इतर रुग्ण शस्त्रक्रियेसाठी संदर्भित सेवा देण्यात यावी. नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्यामार्फत गरजू मोतीबिंदू व इतर नेत्र शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांसाठी संबंधित रुग्णालयांमध्ये संदर्भित सेवा देण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे.