पुणे – बांधकाम व्यावसायिकाची 6 कोटी 24 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात पतीचा नियमित, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांनी फेटाळला. सचिन हनुमंत थोरात आणि पत्नी सुप्रिया (दोघेही, रा. आकुर्डी) अशी जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी जामिनास विरोध केला. याबाबत 37 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे. 2014 ते 2020 या कालावधीत हा प्रकार घडला. डूहूळवाडी मोशी येथील बांधकाम प्रकल्पावर बुकिंग केलेल्या फ्लॅटवर कमिशन देण्याच्या अटीवर पती-पत्नी काम करत होते. दोघांनी परवानगीशिवाय सदनिकाधारकांकडून रोख स्वरूपात 27 लाख 80 हजार स्विकारले. तर, बनावट कागदपत्राद्वारे फिर्यादींच्या कंट्रक्शनचे चिंचवड येथील एका बॅंकेत चालू खाते सुरू केले. त्यावर नऊ कोटी 57 लाख 76 हजार 300 रुपये जमा केले. त्यापैकी 3 कोती 60 लाख 68 हजार 971 रुपये फिर्यादींच्या वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले.
उर्वरित 5 कोटी 97 लाख 7 हजार 329 रुपये रोखीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात सचिन याला अटक करण्यात आली आहे. त्याने नियमित, तर पत्नी सुप्रियाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त् सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी विरोध केला. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी, परस्परच काही फ्लॅटचा ताबा देण्यात आला आहे. ते स्वत: मालक म्हणून वावरत होते. फ्लॅटधारकांना समक्ष बोलावून तपास करायचे असल्याने दोघांचा जामीन फेटाळणयची मागणी ऍड. पताळे यांनी केली.