पिंपरी – सोन्याचा 24 कॅरेटचा पाच ग्रॅमचा कॉइन घेतला. त्याचे 25 हजार 690 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याच्या स्कॅनरवर पैसे पाठविले आहेत, असे खोटे भासविले. मात्र पैसे न पाठविता फसवणूक केली. दिलीप सोनिगरा ज्वेलर्स, हिंजवडी येथे 11 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
जनक गणपत सिंग देवरा (वय 36, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 3) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राहुल शहा (रा. भूमकर चौक, वाकड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचा मित्र महावीर सिंग याच्यासोबत होते. त्यावेळी आरोपी दुकानात आला.
त्याने सोन्याचा 24 कॅरेटचा पाच ग्रॅमचा गोल्ड कॉइन पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर त्याच्या मोबाइलच्या ऍपवरून 25 हजार 690 रुपये फिर्यादीच्या दुकानाच्या ऑनलाइन ट्रान्सफर करण्याच्या स्कॅनरवर पैसे पाठविले आहेत, असे खोटे भासविले. मात्र आरोपीने पैसे न पाठविता 24 कॅरेटचा पाच ग्रॅमचा कॉईन घेऊन जाऊन फसवणूक केली.