वाठार स्टेशन (प्रतिनिधी)- चौधरवाडी ता. कोरेगाव येथे बैलगाडी शर्यतीस बंदी असताना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरवाडी येथे रविवारी दि. २८ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पदूबाईचा माळ येथील आबासो मारुती पिसाळ यांच्या पडीक मोकळ्या जागेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून जमावबंदी तसेच तोंडाला मास्क न लावल्यामुळे सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले. तसेच बैलगाडी शर्यती बंदी उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी रोहित माणिक पवार (गुंड्या) रा. नांदवळ, अक्षय दत्तात्रय शिंदे रा. चौधरवाडी, विक्रम लहू जाधव रा. वाठार स्टेशन, शुभम मधुकर सावंत रा.पिंपोडे बुद्रुक या बैलगाडी चालकांवर गुन्हे दाखल केले.
बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या दहा ते पंधरा लोकांनी पोलिसांचा सुगावा लागताच तिथून पलायन केले. पुढील तपास एएसआय धुमाळ करीत आहेत.