वाळूसह 26 लाखांचे साहित्य जप्त
मंचर- साकोरे (ता. आंबेगाव) येथील घोड नदीपात्रातून बेकायदा उपसलेली 20 ब्रास वाळू, पोकलेन मशीन आणि ट्रॉली असा सुमारे 26 लाख 25 हजार रुपयांचे साहित्य महसूल विभागाने जप्त केले आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल चार जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी घडली.
आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांनी कळंब येथील मंडलाधिकारी शोभा विलास केळकर त्यांना साकोरे गावच्या स्मशानभूमीजवळ व नदीपात्रात बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करून ठेवलेली असल्याबाबत माहिती दिली. त्यानुसार मंडल अधिकारी शोभा केळकर, महाळुंगे पडवळ येथील तलाठी शशांक चौदत्ते, पेठचे तलाठी हेमंत भागवत, रांजणीचे तलाठी विशाल मुंगळे, कोतवाल गणेश मोरे, सरपंच मीराताई बिडकर, पोलीस पाटील सुजाता डोके यांचे पथक घटनास्थळी पोहोचले पोचले असता घोडनदीच्या उत्तर किनाऱ्यांमध्ये उत्खनन केलेले गौण खनिज वाळू अंदाजे वीस ब्रासचे दोन ढिगारे, त्याच्या बाजूस कंपनीचा पोकलेन आणि ट्रॅक्टरची ट्रॉली याप्रमाणे साहित्य मिळून आले. एक लाख दहा हजार रुपयाची वाळू, 24 लाख 70 हजार रुपयांचा पोकलेन मशीन आणि 45 हजार रुपये असे एकूण 26 लाख 25 हजार रुपयांच्या साहित्याचा पंचनामा महसूल विभागाने केला.
दरम्यान वाळू, पोकलेन मशीन आणि ट्रॉली तहसीलदार कार्यालय घोडेगाव येथे नेण्यासाठी कार्यवाही चालू असताना तेथे कारमधून (एमएच 12 – 0027) चौघेजण घटनास्थळी आले. आणि म्हणाले “आमच्या वाळूसाठ्याला हात लावणारे तुम्ही कोण? आमची उत्खनन केलेली वाळू आणि पोकलेन मशीन ट्रॉली घेऊन जायचे नाही. नाहीतर तुम्हाला नदीपात्रात मारून टाकू.’ अशी धमकी देऊन तलाठी शशांक चौदत्ते यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ, दमदाटी केली.
महसूल विभागाच्या पथकाने मंचर पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, सागर खबाले, राजेंद्र हिले हे तेथे आले असता दमदाटी करणारे वाळू चोर पळून गेले. त्यामध्ये वैभव कडुसकर आणि प्रसाद विटकर आणि इतर दोन अनोळखी नागरिक होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन शिंदे पुढील तपास करीत आहेत.