नवी दिल्ली – न्यूझिलंडच्या माजी पंतप्रधान जेसिंडा आर्डन आज विवाहबद्ध झाल्या. विवाह निश्चित झाल्यानंतर करोनाच्या साथीमुळे त्यांचा विवाह वारंवार पुढे ढकलण्यात आला होता. दीर्घकाळापासूनचे जोडीदार क्लार्क गेफोर्ड यांच्याबरोबर त्या आज एका खासगी समारंभामध्ये विवाहबद्ध झाल्या. या कार्यक्रमाचा तपशील वधू-वरांनी फारसा कोणाला समजू दिला नव्हता. हा विवाह समारंभ राजधानी वेलिंग्टनपासून जवळच असलेल्या हॉक बे भागातील एका आलिशान हॉटेलमध्ये झाला.
या विवाह समारंभासाठी केवळ कुटुंबीय, मित्र आणि आर्डन यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील निवडक सहकार् यांनाच निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये आर्डन यांचे उत्तराधिकारी आणि माजी पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांचाही समावेश होता. विवाह समारंभाच्या ठिकाणी लसीकरण विरोधी पोस्टरबाजी करण्यात आली होती. लस सक्तीची केली जाऊ नये, असे या पोस्टरवर लिहीले होते. पोलिसांनी ही पोस्टरबाजी करणार् यांना ताब्यात घेतले.
आर्डन आणि गेफोर्ड हे २०१४ पोसून एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र ५ वर्षांनी त्यांचा साखरपुडा झाला. मात्र करोनाच्या साथीच्या काळात आर्डन यांनीच कार्यक्रमाला कमाल १०० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घातली होती. त्यामुळे २०२२ मध्ये निश्चित करण्यात आलेला विवाह पुढे ढकलण्यात आला होता. एका वेळी तर आर्डन यांनी विवाह रद्दच करण्याची तयारीही दाखवली होती.
वयाच्या ३७ वर्षी २०१७ मध्ये त्या जगातील सर्वात युवा पंतप्रधान बनल्या होत्या. करोनाच्या साथीच्या काळात केलेल्या नेतृत्वामुळे त्या बहुचर्चित राहिल्या होत्या. २०१८ मध्ये त्या पंतप्रधान असतानाच आई झाल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत असतानाच जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.