भोपाळ – कुख्यात अशा चंबळच्या खोऱ्यातील पूर्वाश्रमीचा डाकू मलखान सिंग नुकताच कॉंग्रेसमध्ये दाखल झाला आहे. येत्या काही महिन्यांत मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आपल्या मोठ्या मिशा असलेल्या मलखान सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, मी नेहमीच अन्यायाविरुद्ध लढलो आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यात सत्ताधारी भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत मलखान सिंग म्हणाला की, भाजपच्या नेत्यांनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.
कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मलखान सिंह म्हणाला की, आगामी विधानसभा निवडणुकीत ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशातून भाजपला उखडून टाकू. कॉंग्रेसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माजी शिक्षण विभागाचे अधिकारी संतोष शर्मा यांनी 1,200 समर्थकांसह पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, मलखान सिंग याच्यावर जबरी चोरी, बेकायदा शस्त्रांचा साठा, दरोडे आणि असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, यापूर्वी त्याला पकडण्यासाठी इनामही जाहीर करण्यात आले होते.