मुंबई – सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा मराठी रिमेक करण्याचे फॅड चालू आहे. अनेक गाजलेले दाक्षिणात्य चित्रपट मराठीत प्रदर्शित होत आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची बॉक्स ऑफिसवरही चलती आहे. हा ट्रेंड आणखी एक पाऊल पुढे गेला असून आता पंजाबी चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे. रनिंग हॉर्सेस फिल्म्स आणि ग्लोबल टायटन्स प्रस्तुत ‘वाळू माफिया’ हा चित्रपट लवकरच मराठीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी याव्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. सिमरनजीत सिंग हुंदल लिखित, दिग्दर्शित ‘वाळू माफिया’ येत्या २८ एप्रिल रोजी तिन्ही भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात सिंगा, रांझा विक्रम सिंग, सारा गुरपाल, स्वीताज ब्रार, प्रदीप रावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट वाळू माफियांवर आधारित आहे, याची कल्पना येते. ॲक्शन आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटाचे उदय सिंग, विक्रम सिंग, शिरीन मोरानी सिंग निर्माते आहेत. पोस्टरवरून चित्रपटाची कथा रेत माफियांच्या आजूबाजूला फिरणार असल्याचं स्पष्ट होतंय.
आपल्या देशामध्ये विविध भाषा आहेत.भिन्न लोक विभिन्न राज्यपद्धती असली तरी सर्वसामान्य माणसांच्या समस्या मात्र सारख्याच असतात. अशात वाळू माफिया सारख्या गोष्टी अनेक प्रांतात सर्रासपणे आढळून येतात. हेच लक्षात घेऊन निर्मात्यांनी हा चित्रपट पंजाबी, हिंदीसह मराठीतही रिलीज करण्याचे ठरवले.साऊथ इंडस्ट्रीप्रमाणे हा चित्रपट नेमकं काय वेगळं घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.