पुणे -गोवर रुबेला निर्मूलनासाठी महापालिकेनेही कंबर कसली असून, यासंदर्भात महापालिका हद्दीतील खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात आली आहे. याशिवाय येत्या आठवड्यात बालरोगतज्ज्ञांची बैठकही घेण्यात येणार असल्याचे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.
पुणे मनपा प्रसूतीगृहांमध्ये दररोज नियमित लसीकरण केले जाते. बाह्यरुग्ण विभागामध्ये आठवड्यातून दोनदा आणि अंगणवाडीमध्ये एकदा नियमित लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जोखीमग्रस्त, अति जोखीमग्रस्त ठिकाणी आणि रस्त्यावर आढळणारी बालके यांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येत आहे.
18 नोव्हेंबर रोजी महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व्हेअलन्स मेडिकल ऑफिसर यांच्या उपस्थितीत विभागीय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत “फिवर विथ रॅश’ संशयित गोवर रुग्णाच्या केसेस त्वरित कळवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी गोवर झालेला रुग्ण आढळेल, त्याच्या आजूबाजूच्या 100 घरांचा सर्व्हे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत शहरात “फिवर विथ रॅश’चे 154 नमुने मुंबईतील “हाफकिन इन्स्टिट्यूट’कडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यातील एकही रुग्ण गोवर पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले नाही.
संपूर्ण पुणे शहरामध्ये 27 सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर या ठिकाणच्या बस थांब्यांवर गोवर रुबेला लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
आरोग्य विभागाने केलेली कार्यवाही
महापालिका रुग्णालयाअंतर्गत करण्यात आलेल्या प्रत्यक्ष सर्व्हे करून तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या लोकसंख्येच्या आधारे शून्य ते दोन वर्षे आणि दोन ते पाच वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
पुणे शहरात वरील माहितीच्या आधारे किती लाभार्थी “ड्रॉप आउट’ आहेत तसेच किती “लेफ्ट ऑउट’ आहेत याची माहिती संकलित केली आहे. नागरिकांच्या घरून दररोज कचरा उचलणाऱ्या घंटा गाडीवर गोवर रुबेला लसीकरणाची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.