चंद्रपूर – घराशेजारी खोदकाम करताना चक्क भगवान श्री कृष्णाची मूर्ती सापडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. ही बातमी काही तासातच वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण गावभर पसरली आणि या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमकटा गावातील ही घटना आहे.
या गावात राहणारे गजानन मानकर यांनी घराशेजारी काही कामानिमित्त खड्डा खणायला सुरुवात केली होती. यादरम्यान सुमारे सात फूट खोल खड्डा खणला असता काळ्या दगडासारखे काहीतरी दिसले, तो दगड बाहेर काढला असता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, तो केवळ दगड नसून भगवान श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती होती. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचे काही इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे.
अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती मिळण्याचे हे पहिले उदाहरण आहे. ही मूर्ती दाक्षिणात्य शैलीची आहे. मूर्ती काळ्या दगडावर कोरलेली आहे. श्रीकृष्णाने डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी आहे. ही मुर्ती कोणीतरी दक्षिणेकडून तयार करून चंद्रपूर जिल्ह्यात आणून काही कारणास्तव ती जमिनीत गाडली असण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
उत्खननात मूर्तीशिवाय मंदिराचे कोणतेही अवशेष सापडले नाहीत, या भागात अधिक संशोधन झाले तर इतिहासावर प्रकाश टाकता येईल असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.चंद्रपुरात पाषाणयुगाचे अनेक अवशेष देखील सापडतात. आता चंद्रपूरच्या इतिहासात नवा इतिहास जोडला गेला असून, जिल्ह्यात प्रथमच श्रीकृष्णाची मूर्ती सापडली आहे. मूर्ती सापडल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण आहे.