पुणे -जिल्ह्यात नुकत्याच 176 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार आहे; मात्र जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी कोणीही अर्ज न भरल्याने हे पद रिक्त राहिले आहे. तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 79 जागा रिक्त राहिल्या आहेत.
जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतीपैकी 45 ग्रामपंचायतीच्या निवडणुका हा बिनविरोध झाल्या. तर 176 ग्रामपंचायतींसाठी मतदान रविवारी झाले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 1 हजार 62 जागांसाठी तब्बल 3 हजार 313 उमेदवार रिंगणात होते. तर सरपंच पदाच्या 167 जागांसाठी 519 उमेदवार रिंगणात होते.
एका बाजुला बहुतेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस पहायला मिळाली तर दुसरीकडे 79 जागांसाठी उमेदवारी अर्जच न आल्याने हे पद रिक्त राहिले आहे. निवडणुकीसाठी कोणी अर्ज भरले नाहीत, तर काहींचे अर्ज बाद झाले.
यामुळे सदस्य पद रिक्त राहिले आहे. आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडून जाहीर होईल. त्यावेळी या जागांसाठी निवडणुक प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सरपंचपद रिक्त राहिलेली गावे
भोर तालुक्यातील 2 गावे, दौंडमधील 1, जुन्नरमधील 1 गाव आणि मुळशीमधील 1 गावांचा समावेश आहे. सदस्यपद रिक्त असलेली गावे वेल्हा तालुक्यातील 18 ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त आहे. भोरमधील 22, दौंडमधील 1, जुन्नरमधील 16, आंबेगावमधील 8, खेडमधील 2, मावळमधील 1 आणि मुळशीमधील 11 ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त आहेत.