इंदोर: देशाला करोना संकटापासून मुक्त होण्यासाठी आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. परंतु या आणीबाणीच्या काळात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये करोना संशयितांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकावरच मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यावेळी जमावाने या कर्मचाऱ्यांवर अक्षरश: जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने हे सर्व आरोग्य कर्मचारी या हल्ल्यातून बचावले.
एकीकडे, डॉक्टर जीव धोक्यात ठेवून रुग्णांचे जीव वाचवत आहेत. पण काही लोक असे आहेत की जे या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे प्रकरण इंदूरमधील ताटपट्टी भाखल या परिसरातील आहे. या भागातील एक महिला ही करोना संशयितांच्या संपर्कात आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यामुळे तेथे आरोग्य विभागाचे एक पथक पोहोचले होते. आरोग्य विभागाची टीम तिथे पोहोचताच लोकांनी त्यांना घेरले आणि त्यानंतर त्यांनी दगड व काठीने हल्ला करण्यास सुरवात केली.
या हल्ल्यात दोन महिला डॉक्टर जखमी झाले आहेत. दगडफेक झाल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.