पुणे – सध्या राज्यभरात व्हाट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, “आज रात्री 12.30 ते पहाटे 3.30 पर्यंत तुमचे मोबाईल बंद ठेवा. तुमच्या शरीरापासून दूर ठेवा. सीएनएन टेलिव्हिजनने ही माहिती दिली आहे. कृपया आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना सांगा. आज रात्री 12.30 ते पहाटे 3.30 पर्यंत कारण आपला ग्रह खूप जास्त रेडिएशन उत्सर्जित करेल. वैश्विक किरण पृथ्वीच्या जवळून जातील. त्यामुळे कृपया तुमचे मोबाईल बंद करा. तुमचे डिव्हाइस तुमच्या शरीराजवळ सोडू नका, त्यामुळे तुमचे भयंकर नुकसान होऊ शकते. Google, NASA आणि BBC बातम्या पहा. तुमच्यासठी महत्वाच्या असलेल्या सर्व लोकांना हा संदेश पाठवा. तुम्ही लाखो लोकांचे जीव वाचवाल.” असा मेसेज राज्यभरात व्हायरल होत आहे. मात्र ही माहिती खोटी आहे. मेसेजमध्ये लिहिल्याप्रमाणे काहीही होणार नाही. गेल्या सहा वर्षांपू्र्वी देखील असाच मजकूर असलेला मेसेज सर्वत्र व्हायरल झाला होता.
संबंधित मेसेजची पडताळणी करण्यासाठी आम्ही नासाच्या वेबसाईटवर याबाबतचे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला. कितीही सर्च केल्यानंतर आम्हाला 12:30 ते 3:30 पर्यंत मोबाईल फोन बंद ठेवण्याबाबतचा इशारा कुठेही दिसला नाही. तसेच वैज्ञानिकांनी हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजचा दावा खोटा आहे. आज रात्री 12:30 ते पहाटे 3:30 पर्यंत मोबाईल फोनचा स्फोट होणार हा दावा पूर्णपणे खोटा आहे. तो मेसेज ग्रुपवर व्हायरल करणे थांबवावे. कोणीही तो मेसेज व्हायरल करू नये..