पुणे- तंत्रशिक्षण संचालनालयच्या अखत्यारितील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षा “एमसीक्यू’ पद्धतीने होत आहे. या परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) प्रसिद्ध केल्या आहेत. यात पॉलिटेक्निकच्या अंतिम परीक्षा 6 ते 15 ऑक्टोबरपर्यंत होणार असून, त्याचा निकाल 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) दहावी व बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष परीक्षेसाठी सुमारे 1 लाख विद्यार्थी बसणार आहे. त्यापूर्वी सराव परीक्षा 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. पॉलिटेक्नीकसह अन्य अभ्यासक्रमांची लेखी परीक्षा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होत आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांना एका तासात 40 पैकी 30 प्रश्न सोडवावे लागतील, अशी माहिती “एमएसबीटीई’कडून देण्यात आली.
दरम्यान, ऑनलाइन परीक्षा देण्यापूर्वी इंटरनेटचा स्पीड तपासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर लॉगीनआयडी आणि पासवर्ड पाठवला जाणार आहे. तो विद्यार्थ्यांने गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जवळच्या पॉलिटेक्निक संस्थेत परीक्षा देता येणार आहे. परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार असून सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते 6 या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एखाद्या पेपरसंदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुन्हा तो पेपर देण्याची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव विजय जाधव यांनी दिली.
“एमएसबीटीई एक्झाम’ ऍप तयार…
पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षेची माहिती होण्यासाठी सराव परीक्षा होणार आहे. त्यासाठी एमएसबीटीई एक्झाम नावाचे मोबाइल ऍप तयार करण्यात आले आहे. या मोबाइलवर लॉगइन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाणार असून, त्यामार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार असल्याचे “एमएसबीटीई’ने स्पष्ट केले आहे.