पिंपरी: काळेवाडी येथे गस्तीवरील पोलिसाला मारहाण करणाऱ्या लोहमार्ग विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक दीपक साकोरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
मतीन युनूस आतार असे निलंबन करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी (दि. २७) महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक काळेवाडी परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, मतीन याचे वडील युनूस आतार हे रस्त्याने विनाकारण फिरत असताना त्यांना दिसले .
पथकातील पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. या रागातून मतीन आणि वडील युनूस व भाऊ मोईन या तिघांनी मिळून कळकुटे यांना बेदम मारहाण केली.
याप्रकरणी तिघांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक साकोरे यांनी मतीन आत्तार यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.