पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जागतिक महिला दिनानिमित्ताने संधिवात या विषयांवर महिलांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी भारतातील नामवंत डॉक्टरांनी संधिवात या आजारावर काम करणारी आणि महिलांसाठी मार्गदर्शन ठरणारी संघटना ‘वीरा’ या नावाने सुरू केली आहे.
असोसिएशनच्या माध्यमातून महिलांसाठी पुढे विविध आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिरे आणि उपक्रम राबवले जाणार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये संधिवाताचा त्रास अधिक प्रमाणात आढळून येतो. संधिवात आणि एसएलई हा वीस ते चाळीस वयोगटांतील स्त्रियांना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनावर वाईट परिणाम होतो. हीच बाब लक्षात घेऊन संघटनेने काम सुरू केले आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कविता कृष्णा यांनी सांगितले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, सचिव डॉ. वैजयंती लागू जोशी, डॉ. अरविंद चोप्रा, सदस्य डॉ. संदीप कानसुरकर, डॉ. वर्षा भट्ट, डॉ. गायत्री एकबोटे आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.