प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -“प्रत्येक मंडळांच्या गणेश कार्यकर्त्यांसाठी आर्थिकदृष्ट्या रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शहरातील अष्टविनायक मंडळापैकी सात मंडळांच्या वतीने गणेश कार्यकर्त्यांसाठी ‘मोरया कार्यकर्ता मंचाची’ स्थापना करण्यात आली आहे. त्याबरोबरीने या वर्षीचा गणेशोत्सव हा मद्य आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ अशी माहिती कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.
https://www.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/08/madya-plastic-mukt.jpg
या सात मंडळाच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेटे यांच्यासह तांबडी जोगेश्वरीचे नितीन पंडीत, केशव नेऊरगावकर, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, केसरीवाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन आदी मान्यवर उपस्थित होते. “मानाच्या सात मंडळांनी एकत्रितपणे येत मोरया कार्यकर्ता मंचाची स्थापना करण्यात आली आहे. गणेश कार्यकर्ता हा प्रत्येक मंडळाचा गाभा असतो. गणेशोत्सव केवळ 10 दिवसांचा असला तरीदेखील त्यासाठी कार्यकर्ता वर्षभर झटत असतो. त्यांना सक्षम करण्यासाठी मंचाच्या वतीने सुमारे 2 ते 5 लक्ष रुपयांची कर्ज व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी बॅंकांसोबत बोलणे सुरू आहे. यातून रोजगार निर्मितीसह देशाच्या अर्थव्यवस्थेत खारीचा वाटा उचलण्याचा मानस आहे,’ अशी भावना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पुण्यात निर्माण होते ते देश-जगात विकते जाते. यापूर्वी पुण्यात गणेश मंडळांनी हौदात विसर्जन, निर्माल्य संकलन असे उपक्रम राबवले आहेत ज्यांचे अनुकरण इतरत्र झाले आहे. शासन, प्रशासन एकत्र येऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने समाजाभिमुख उत्सव अगदी दैदीप्यमान होईल, यासाठी पूर्वीपासून प्रयत्न झाले. तीच परंपरा आम्ही पुढे नेत आहोत.
– पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त,
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट