सातारा – जिल्हा रुग्णालय सातारा वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित झाले आहे. मात्र, अजूनही मेडिकल कॉलेजच्या डीनकडे जिल्हा रुग्णालयाचा कार्यभार हस्तांतरित झालेला नाही. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या तांत्रिक अडचणीने ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल कॉलेजच्या बांधकामाची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शिक्षणही सुरू झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रशासकीय इमारत आणि इतर आस्थापनाविषयक सुविधा त्यासाठी असणारी जागेची अडचण या घोळामध्ये वैद्यकीय आस्थापना मंडळ कागदावरच राहिले आहे. राज्यातील सत्ताबदल, मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी लागणाऱ्या निधीची अनुपलब्धता त्यामुळे बऱ्याचशा तांत्रिक अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीत. पहिल्या पाच वर्षासाठी जिल्हा रुग्णालयाचा अधिभार हा सातारा मेडिकल कॉलेजच्या डीनकडे सोपवला जातो. येथील प्रशासन आणि आस्थापना याची संपूर्ण जबाबदारी डीनची असून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रत्यक्ष या कामाची अंमलबजावणी करायची आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी केवळ ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयांचे काम पाहयचे आहे. प्रत्यक्षात अजूनही महाविद्यालयाचे डीन डॉ. पवार यांना स्वतःचे स्वतंत्र केबिन मिळालेले नाही. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून अद्यापही रुग्णालय पदाचा चार्ज डीनकडे देण्यात आलेला नाही. हस्तांतरणाची प्रशासकीय इच्छाशक्ती दाखविली जात नाही. त्यामुळे बऱ्याचशा तांत्रिक प्रक्रिया या हस्तांतरणांमुळे अडकून पडल्या आहेत.
पत्र्याच्या शेडमध्ये मेडिकलचे वर्ग
जिल्हा रुग्णालयामध्ये मारामारीच्या प्रकरणातून नुकतीच तोडफोड झाली होती. यासंदर्भातही कोणतीही कठोर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सकांनी केली नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा अडचणीचे ठरणारे आहेत. कृष्णानगर येथील सिंचन विभागाच्या जागेवर इमारतीच्या बांधकामाचे ट्रायल सुरू आहे. सध्या तेथे भरणारे मेडिकल कॉलेजचे वर्ग चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरत असल्याची माहिती आहे. आस्थापना मंडळाच्या सुसूत्रीकरणाअभावी पुढील महत्त्वाची कामे खोळंबली असून आरोग्य यंत्रणेला त्याचे कोणतेही घेणे देणे नाही.