रिकामं मखर

घर हे एक मखर असतं आणि घरातली माणसं, येणारे-जाणारे पाहुणे हे त्या मखरातले देव असतात. घरात पाहुणे येतात. आपला आनंद ओसंडून वाहतो. पाहुणे येतात तेव्हा घरातली चिल्लीपिल्ली खूश असतात. आता पाहुण्यांच्या निमित्ताने रोज काहीतरी डिश होईल. पाहुण्यांसोबत आपल्याही वाट्याला येईल. पाहुणे चार आठ दिवस राहतात. त्यांचा बेत असेल तसे परत जातात. जाताना कृतज्ञचे आहेर देतात. मनोमन संपन्नतेचे, समृद्धीचे आशीर्वाद देतात. पाहुणे गेले की घर एकदम अंगावर येतं. ओकंबोकं दिसू लागतं. घरातले पाहुणे लक्षात घेऊन चहाचं पातेलं गॅसवर चढवायची सवय झालेली असते. पाहुणे गेल्यानंतर तेच मोठं पातेलं हाती येतं. मग लक्षात येतं अरे, पाहुणे तर गेले. आपल्या चार जणांचाच चहा ठेवायचा आहे. उदास मनाने मोठं पातेलं जागेवर ठेवून छोट्या पातेल्याला हात घातला जातो. पाहुणे गेल्यावर एक दोन दिवस भाजी कधी खारट होते तर कधी तिखट होते. जमेतल्या माणसांचा विसर पडत नाही आपल्याला. अंगी असणारं माणूसपणही असं अंगाशी येतं कधी कधी. पाहुण्यांशिवाय घर म्हणजे “रिकामं मखर’ वाटू लागतं.

घर नावाच्या मखरात आणखी एक मखर असतं. गणपती येतात. त्या मखरात बसतात. धूप होतो. दीप होतो. सकाळ संध्याकाळ आरती होते. टाळ्यांचा ताल घुमतो. प्रसाद दिला जातो. देवाला नमस्कार होतो. गणपती आशीर्वाद देतो. मखर सुद्धा खुशीत असतं. देवासोबत आपल्यालाही नमस्कार होतो म्हणून. आपणही खुशीत असतो. घरात चैतन्याचं वारं वहातं. गोडधोड होतं. चांगलं खायला मिळतंच, पण चांगलं प्यायलाही मिळतं. चौकाचौकात, रस्त्याच्या कडेला तात्पुरते मखरं उभारले जातात. कनाती बांधल्या जातात. विजेची रोषणाई होते. गाण्यांचा जल्लोष होतो. बघ्यांची गर्दी होते. देवाला नमस्कार होतात. काही नमस्कार अंतःकरणाच्या कुपीतून असतात. काही देव दिसला म्हणून आलेले असतात. देव आशीर्वाद देतात, भाविकालाही आणि बघ्यालाही. पण जसं कर्म असेल तसा आशीर्वाद. आसमंत चैतन्याने भरून जातो. पूजा होते. महाप्रसाद होतो. गणरायाच्या विसर्जनाची वेळ येते. मिरवणुका निघतात. तुताऱ्यांच्या सुरावटी उमटतात. लेझीमचे डाव होतात. ढोल दणाणतात. तर्र…र्र…र्र तडतड करत ताशे तडाडतात. कर्ण्यांचे आवाज कानांच्या भिंतीला धडकतात. काळजाच्या धडधडीला हादरे देतात. आलेले पाहुणे जातात तसेच गणपतीची. मखरं रिकामी पडतात. मांडव ओस पडतात. कनाती दूरवर नजर टाकतात. पण कुठेही गर्दीचा मागमूस दिसत नाही. गर्दी आपल्यातच हरवून जाते. गर्दीला “रिकाम्या मखरां’ ची जाणीव सुद्धा नसते.

कुंड्या देखील मखरंच वाटतात मला. घरांच्या खिडकीत असतात ही मखरं. वेगवेगळ्या झाडांचे देव बसतात या मखरात. त्यातच एक तुळशीचं रोपटं असतं. मनोभावे पुजलं जातं. सगळ्या रोपट्यांना सकाळ संध्याकाळ पाणी घातलं जातं.जाता येता डोळ्यांच्या निरंजनांनी कुंडीतल्या झाडांची आरती केली जाते. तुळशीला उदबत्ती लावली जाते. नमस्कार केला जातो. इतर कुंड्या आणि त्या कुंड्यातली झाडंही आपल्याला सुद्धा नमस्कार पोहचतो म्हणून खूश होतात. या कुंड्यांमधले रोपट्याचे देवही आशीर्वाद देतात. कुणी ओंजळीत फुलं देतं. कुणी डोळ्यांना खिडकीतल्या हिरवाईचं सुख देतं. हा देह देखील एक प्रकारचं मखरंच आहे. विधाता या मखरात “प्राणदेवते’ची स्थापना करतो. “मन’ नावाच्या देवतेचा या मखरात निवास असतो. पण माणूस मोठा होतो. निसर्गनियमानुसार देहाने वाढतो. बुद्धिनेही वाढतो. बुद्धी हे विधात्याने त्याला दिलेलं अस्त्र आहे. पण त्याचा वापर कसा करावा हे त्याला कळत नाही. तो देहातल्या देवाला विसरून जातो. मखराचेच लाड पुरवतो. त्यालाच रंगबेरंगी कपड्यांनी सजवतो. विविध प्रकारचे चमचमीत नैवद्य दाखवून मखराला खुशीत ठेवतो. पण प्राणदेवतेला नैवद्य हवा असतो व्यायामाचा. मनाला गरज असते ती सद्विचारांच्या नैवद्याची. पण तो नैवद्य कधीच नाही दाखवत आपण मखरातल्या देवांना. मखराची सजावट करावी तशी देहाची सजावट करतो. त्यालाच नैवद्य दाखवतो. त्यातले प्राण देवतेसह, मनसुद्धा देह सोडून जातं. देहाची रंगरंगोटी, देहाचे पुरवलेले लाड, त्याला दाखवलेले नैवद्य काहीही कामी येत नाही. प्राणांविना देह म्हणजे एक “रिकामं मखरंच’.

हे ब्रह्मांड म्हणजे एक मखरंच. ईश्‍वर त्यात कुठेतरी अज्ञात ठिकाणी बसलेला आहे. हे विश्‍वच ज्याचं मखर आहे त्या देवाला तात्पुरत्या मखरांची कधीच गरज नसते. मखराच्या सजावटीची तर मुळीच गरज नसते. ती सजावट आपण करतो आपल्या डोळ्यांना सुख लाभावं म्हणून. आपल्या मनाला देवासाठी काहीतरी केल्याचा आनंद लाभावा म्हणून. धूप दीप केल्याने आपल्याला प्रसन्नता वाटते. देवघरात दिवा लावल्याने आपल्या मनातला अंधार दूर होतो. ही पृथ्वी म्हणजे सुद्धा मखरंच आहे एक प्रकारची. या मखरात विधात्याने मानव देवतेची स्थापना केली. माणसाच्या करमणुकीसाठी पशुपक्ष्यांची निर्मिती केली. सजावटीसाठी वृक्षवेलींची निर्मिती केली. ठिकठिकाणी झाडाझुडपांची सजावट केली. मानव देवतेला आनंद देता यावा म्हणून विविध गंधांची फुले निर्माण केली. वाहणारा वारा निर्माण केला. वाऱ्याला वेणूच्या बनात पाठवून सूर निर्माण केले. पानांचा सळसळाट निर्माण केला. ओढ्यांचे खळखळाट निर्माण केले. आपण प्राणप्रतिष्ठा केलेल्या मानवदेवते पुढे अंधार नको म्हणून विधात्याने या पृथ्वीच्या मखरात सूर्याचा दिवा लावला. चांदण्याची तोरणं बांधली. पण माणूस देवासारखा वागत नाही. तो विधात्याने निर्माण केलेली सजावट उद्‌ध्वस्त करतो. पशुपक्ष्यांची शिकार करतो. जातीधर्माचे विष पेरून आपापसात लढतो. पृथ्वीचा मखर रक्‍तरंजित करतो. एक दिवस मानवाने हा पृथ्वीचा मखर रिकामा करू नये हीच विधात्याची इच्छा असावी. पण दुसऱ्याच्या इच्छेचा मान राखेल तो माणूस कसला?

विजय शेंडगे

Leave A Reply

Your email address will not be published.