आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी…

साधारणतः दोन महिन्यांपूर्वीचा प्रसंग असावा. मित्रमैत्रिणींसह एका उंच डोंगरावर ट्रेकिंगला जाण्याचा योग आला होता. कडक ऊन असल्याने आम्ही 10 ते 12 जण पहाटे 6 वाजता नियोजित स्थळापासून निघालो. सूर्याची कोवळी किरणे आणि त्यात अंगाला सुखद अनुभव देणारा पहाटवारा सारे काही आल्हाददायकच होते. आपापल्या गाड्या घेऊन एकमेकांचा पाठलाग करत आमची स्वारी निघाली होती. तासभराच्या दुचाकी स्वारीनंतर 7 ते 7:15 च्या सुमारास आम्ही सर्वजण त्या उंच डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. सर्वांनी एका टपरीवर चहा नाश्‍ता केला. त्यानंतर तेथील एका हॉटेलजवळ गाड्या पार्क करून डोंगर सर करण्याच्या मोहिमेस प्रारंभ केला. गप्पा मारत, गाणी म्हणत आणि मौजमजेत आम्ही डोंगर चढत होतो. निसर्गाचे सौंदर्य, किलबिल करणारे पक्षी अशा नैसर्गिक गोष्टींचा आनंद घेत काही अंतर कापले. थोड्या अंतरावर जाताच आमच्यातील काहीजणांना अचानक अस्वस्थ असल्यासारखे वाटू लागले. त्यातील एकाने शेवटी त्या अस्वस्थतेला बांध फोडलाच. तो बोलला, अरे यार… गप्पांच्या नादात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरूनच गेलो रे. इतरांनी मोठ्या कुतूहलाने विचारले,काय रे? खिशात हात घालून मोबाइल बाहेर काढत जग जिंकल्याच्या आनंदाने तो बोलला, अपनी जानेमन… मोबाइल रे.
इतरांनीही काहीतरी मोठी गोष्ट विसरल्याच्या अविर्भावात हो रे खरंच की, थॅंक्‍स रे आठवण करून दिल्याबद्दल म्हणत आपापली शस्त्रे (मोबाइल्स) बाहेर काढली. निसर्गाच्या प्रतिमा कैद करण्यासाठी साऱ्यांनी आपापली शस्त्रे सज्ज केली. आता गप्पा गोष्टींसह बागडण्याचा मनमुराद आनंद मिस्टर इंडिया प्रमाणे अचानक गायब झाला होता. मोबाइलला साथी बनवीत जो तो पुढे चालला होता. त्या डोंगराच्या अर्ध्यावर जाताच एकजण ओरडला, अरे थांबा तो बघा कसला छान पॉइंट आहे फोटोसाठी आणि सर्वांनी आनंदाने होकारार्थी मान डोलावली. सर्वजण त्या स्पॉटवर फोटो काढण्यासाठी आतुर झाले. नंतर सर्वांनी मिळून एक ग्रुप सेल्फी घेण्याचे ठरविले. तेवढ्यात आमच्यातील एक मैत्रिण दुसऱ्या मैत्रिणीला उद्देशून म्हणाली, अगं घामाने चेहऱ्याचा संपूर्ण मेक-अप बिघडला आहे. तितक्‍यात आमच्यापैकी एक मित्र खोचकपणे बोलला, आता मेकअप करायला आरसा पण नाही, अरेरे. तिनेही तितक्‍याच तत्परतेने लगेच उत्तर दिले, आता आरशाचा जमाना गेला मोबाइल आहे की. आणि काही क्षणातच मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्यात पाहत त्यांनी नट्टापट्टा करायला सुरुवात केली. त्यातही एकजण पुन्हा बोलला, मोबाइलच्या कॅमेऱ्याने कदाचित स्वतःचा चेहरा कसा आहे हे समजेल. पण दमलेला निस्तेज चेहरा सेल्फीमध्ये येईलच की.  त्यावर मोठ्या तोऱ्याने ती बोलली, बाळा मोबाइलमध्ये ब्युटी मोड असतो. पाहिजे तसे एडिट करता येते. तुला तुझा चेहरा गोरा करून देऊ काय? आता तो मित्र मात्र पुरताच खजील झाला.  माझ्या मनात लगेच एका गाण्याच्या चालीने ठेका धरण्यास सुरुवात केली. ते गाणे होते,
मी कशाला आरशात पाहू गं?
मी कशाला बंधनात राहू गं?
मीच माझ्या रूपाची राणी गं…
सुमारे 70च्या दशकातील एका मराठी चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं ते गाणं आज तंतोतंत लागू होत होतं. ती त्या काळातील दूरदृष्टी म्हणावी की, केवळ योगायोग हे मला समजत नव्हते. मानवाने तंत्रज्ञान आणले त्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा वापर पुरेपूर कसा करायचा हेही त्या मानवालाच चांगले अवगत आहे. परंतु मानवाला हे विसरून चालणार नाही की, आरसा नैसर्गिक व वास्तव प्रतिमा आपल्यासमोर आणतो, तर मोबाइल चित्र हे सोयीनुसार अवास्तव बदलेली प्रतिमा आपल्या नजरेस आणते. आरसा आपल्यातील उणिवांना आपल्या नजरेत आणून देतो. परंतु कॅमेरा त्या उणिवा एडीट करून खोटा नाटा भपकेबाजपणा दाखवित असतो.
मुळात आज तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी सहजशक्‍य झालेल्या आहेत. नव्हत्याचे होते करणारे अनेक अत्याधुनिक टूल्स टेक्‍नॉलॉजीच्या जगात कमालीचे प्रसिद्ध आहेत. परंतु खरा प्रश्‍न पडतो तो आपण आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करावा की, एडिट करावा?
तर याचे उत्तर नक्‍कीच हे असायला हवे की, प्रतिमा बदलण्याचा.
तेही केवळ बाह्यरूपाने नाही तर अंतरी असणाऱ्या सामर्थ्याने.
आजकाल फोटोशॉप आणि इतर टूल्समधून आपल्याला हवे तसे व्यक्‍तिमत्त्व (फोटोपुरते) दाखविता येते. त्यातून अनेकदा स्वतःचा स्वार्थ साधून इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होतो. तंत्रज्ञानाच्या आभासी दुनियेत अशा विविध आभासी प्रतिमा स्वतःचा आणि इतरांचा घात करण्यास कारणीभूत ठरत असतात. विविध विवाहनोंदणी साइट्‌सवरून फसवणुकीचे प्रयत्न केले जातात. फोटोमधील चेहऱ्यात फेरफार करून अनेक प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. तरुणींच्या फोटोंमध्ये फेरफार करून अश्‍लीलता पसरवून बदनामीचे प्रयत्न केले जातात. अनेकदा वरवर सुंदर दिसण्याची ही स्पर्धा जीवघेणी ठरते. त्यातून ऍसिड हल्ले व प्राणघातक हल्लेही घडताना पाहावयास मिळतात. यातूनच आठवतात त्या जगदीश खेबूडकरांच्या ओळी,
स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी…
थोडक्‍यात एवढे सांगण्याचा अट्टाहास एवढाच की, बाह्य प्रतिमेच्या आभासी दुनियेत रमण्यापेक्षा मनाची अंतर प्रतिमा सुस्पष्ट आणि पारदर्शक असायला हवी. दिसण्यापेक्षा असण्यातून प्रतिमेचे प्रतिबिंब आपल्या व्यक्‍तिमत्त्वात डोकवायला हवी. आपली प्रतिमा सकारात्मक, प्रेरणादायी आणि आनंददायी कशी बनेल यासाठी नक्‍कीच विचार करायला हवा. बाकी हे आचरणात आणून मग टाइम पास म्हणून सेल्फी किंवा फोटोत मिरवायला काहीही हरकत नाही.

सागर ननावरे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×