पुणे – राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 12 ते 17 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. याद्वारे नोकरीइच्छुक युवक-युवतींसाठी राज्यभरातील रोजगारांची संधी मिळणार आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. आता राज्यातील बहुतांश उद्योग व व्यवसाय पुर्ववत कार्यरत झालेले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या
नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अल्पसंख्याक व विकासमंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार महारोजगार मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
इयत्ता नववी पास पासून पुढे किंवा दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. विविध
क्षेत्रातील 20 ते 25 हजार रिक्त पदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारची रिक्तपदे नोंदविलेली आहेत.
ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा रोजगार मेळावा असणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईला भेट
द्यावी लागणार आहे. उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती पाहून आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता उमेदवारांना घ्यावी लागणार आहे.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे.
शक्य तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.