पुणे : एक गृहिणी ‘माई’एका अंत्यसंस्काराला गेलेली असताना तिला जाणवते की अशा वेळी मृत व्यक्तीचा फोटो शोधला जातो. पण माईला फोटो काढण्याविषयी भीती असल्याने आजवर तिचा एकही फोटो नाही याची तिला जाणीव होते. त्यावर मात करत ती स्वतःचा चांगला फोटो असावा यासाठी प्रयत्न करते, याविषयी हा चित्रपट आहे.
या चित्रपटात मुख्य पात्राचा भौतिक व भावनिक असा दोन्ही प्रकारचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यातील भावनिक प्रवासाविषयी चलचित्रकार केदार फडके म्हणाले, “चित्रपटाच्या फ्रेम मधील पात्राच्या जागेवरून त्याचा भावनिक प्रवास दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. आमच्या मुख्य पात्राला कॅमेऱ्याविषयीच भीती आहे. त्यामुळे सुरुवातीच्या फ्रेम्समध्ये हे पात्र कायमच फ्रेमच्या केंद्रापासून दूर दाखविले आहे. जसजसा पात्राचा आत्मविश्वास वाढत जातो तसे ते फ्रेमच्या केंद्रस्थानी येत जाते.”