भूवनेश्वर – प्रसिद्ध ओरिया साहित्यिक रजत कुमार कर (वय 88) यांचे रविवारी भुवनेश्वर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होते. रजत कुमार कार यांना 2021 मध्ये साहित्य आणि शिक्षणासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रजत कुमार दुपारी जेवण करून ते विश्रांतीसाठी गेले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
वार्षिक रथयात्रेत सहा दशके टीव्ही आणि रेडिओवर भाष्य करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. जगन्नाथ संस्कृतीचे ते कुशल वक्ते होते. ओडिशातील मरणासन्न पाल कलेचे पुनरुज्जीवन करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ते उपेंद्र भांजा साहित्यातील विपुल लेखक होते. त्यांनी भगवान जगन्नाथावरही काही पुस्तके लिहिली आहेत.