कोल्हापूर – वीज बील सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बीलातील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत असून ऑनलाईन अर्ज प्रणाली अधिक सुलभ करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी आज इचलकरंजी येथे बोलताना केले.
पुढील वर्षी जाहीर होणाऱ्या वस्त्रोद्योग धोरणापूर्वी यंत्रमागधारकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये प्रत्येक यंत्रमाग बहुल जिल्ह्यातील प्रतिनिधींचा समावेश केला जाणार आहे. तसेच वस्त्रोद्योग व्यावसायिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण त्या-त्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरविताना वस्त्रोद्योगातील तज्ज्ञांच्या मताबरोबरच वस्त्रोद्योग व्यवसायात काम करणाऱ्या व्यावसायिकांची मते जाणून घेऊन राज्याचे सर्व समावेशक असे वस्त्रोद्योग धोरण ठरविले जाणार आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणात कोणत्याही उद्योग घटकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे, असे शेख यांनी सांगितले.