मुंबई: राजस्थान विधानसभा निवडणुकांदरम्यान एका पोस्टरवरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. यावेळी उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उल्लेख ‘हिंदू हृदय सम्राट’ असा करण्यात आला. या पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावत सडकून टीका केली आहे.
“पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार!” अशा शब्दात ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटाचा समाचार घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय…बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदूहृदयसम्राट म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस केलाय. किती मास्क लावून फिरणार त्यापेक्षा अॅक्टिंगचं काम तुम्हाला चांगलं जमतं, असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे.
तर संजय राऊत यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सत्तेसाठी बेईमानी करणा-यांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असावी. बाळासाहेबांनी सत्तेसाठी बेईमानी केलेली नाही. एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट म्हणून काय असं महान कार्य केलं? अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.
नेमक काय आहे पोस्टरमध्ये?
राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज (हाथोज धाम) यांच्या प्रचारासाठी काल एकनाथ शिंदे गेले होते. यावेळी शास्त्री नगर भागापासून भाजप कार्यालयापर्यंत विशाल वाहन रॅली काढण्यात आली.यासंबंधी माहिती देणाऱ्या पोस्टरच्या सर्वात वर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, वसुंधरा राजे यांच्यासह काही भाजप नेत्यांचे फोटो आहेत. त्याखाली ‘हिंदू हृदय सम्राट माननीय एकनाथ शिंदे जी का हवामहल की पावन धारा पर हार्दिक स्वागत’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यावरुन ठाकरे गट आक्रमक झाले आहेत.