बंगळूर -माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएसने कर्नाटक विधान परिषद निवडणुकीसाठी सात उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये देवेगौडा यांचे नातू सुरज रेवण्णा यांचाही समावेश आहे. त्यामुळे देवेगौडा यांच्या कुटूंबातील आठवा सदस्य निवडणूक रिंगणात उतरला आहे.
स्वत: देवेगौडा राज्यसभा सदस्य आहेत. त्यांचे थोरले पुत्र आणि सुरज यांचे वडील एच.डी.रेवण्णा हे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आहेत. सुरज यांच्या आई भवानी या जिल्हा पंचायतीच्या सदस्या आहेत. तर, सुरज यांचे भाऊ प्रज्वल हे लोकसभेचे सदस्य आहेत. देवेगौडा यांचे दुसरे पुत्र एच.डी.कुमारस्वामी हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार आहेत. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता याही आमदार आहेत.
कुमारस्वामी यांचे पुत्र आणि जेडीएसच्या युवा शाखेचे अध्यक्ष निखिल यांनी 2019 मधील लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले. आता सुरज यांचाही निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश झाला आहे.
ते विजयी झाल्यास राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशा चारही लोकप्रतिनिधींच्या प्रमुख सभागृहांत देवेगौडा कुटूंबाचे सदस्य दिसतील. भाजप आणि कॉंग्रेसशिवाय जेडीएस हा कर्नाटकमधील महत्वाचा राजकीय पक्ष आहे.